सेनगाव:-सोनारास महामार्गावर अडवुन चाकुचा धाक दाखवुन जबरीने सोन्या-चांदिचे दागीने लुटणारे अट्टल दरोडेखोरांची आंतरजिल्हा टोळी जेरबंद ३० लाखांचा सोन्या-चांदिचा लुटलेला मुद्देमाल जप्त, कापडसिंगी येथील बँक फोडल्याची सुध्दा कबुली दिली आहे. (स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली ची कार्यवाही)

सेनगाव पोलीस ठाणे हद्दीत भरदिवसा महामार्गावर सोनाराला लुटणाऱ्या अट्टल दरोडेखोरांच्या आंतरजिल्हा टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. आरोपींकडून सुमारे ३० लाख रुपये किंमतीचे सोने–चांदीचे दागिने व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तपासादरम्यान कापडसिंगी येथील बँक फोडल्याचीही कबुली काही आरोपींनी दिली आहे.

दि. ३० जानेवारी २०२६ रोजी धानोरा शिवारात कापडसिंगी–लोणार मार्गावर ही धाडसी लूट झाली होती. फिर्यादी सुरेश संभाजी खंदारकर (वय ३७, रा. लोणार, जि. बुलढाणा) हे कापडसिंगी येथील आपल्या सोन्या–चांदीच्या दुकानाचे काम आटोपून मोटारसायकलने लोणारकडे निघाले होते. त्यावेळी एका मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांचा पाठलाग करून वाहन पाडले व चाकूचा धाक दाखवून ११४ ग्रॅम सोने, ३६०० ग्रॅम चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे ३० लाखांचा मुद्देमाल लुटून पसार झाले. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९/२०२६ दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मिना, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली ग्रामीण राजकुमार केंद्रे यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखा व सेनगाव पोलीस ठाण्याचे पथक समांतर तपास करत होते.

सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहितीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीसांनी संशयितांचा माग काढला. त्यानुसार परमेश्वर उर्फ सागर साहेबराव पडोळेकर (रा. आखणी, ता. मंठा, जि. जालना), राहुल मोहन पवार (रा. मोहाडी तांडा, जालना), शोएब हमीद पठाण (रा. सेलू, जि. परभणी), अभिषेक प्रल्हाद धनवडे (रा. मंठा, जालना), भगवान विनायक हराळ व तुकाराम पुंजाराम हराळ (दोघेही रा. कापडसिंगी, ता. सेनगाव, जि. हिंगोली) या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत कापडसिंगी येथील दोघांनी सोनाराची हालचाल व माहिती टोळीला पुरवल्याचे उघड झाले. आरोपींकडून गुन्ह्यातील ११ तोळे ४ ग्रॅम सोने, ३ किलो ६०० ग्रॅम चांदीचे दागिने, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासात हीच टोळी पूर्वी कापडसिंगी येथील बँक फोड प्रकरणातही सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, सपोनि. शिवसांब घेवारे, दिपक मस्के, पोउपनि. दिलीप मोरे, रविकिरण खंदारे यांच्यासह हिंगोली, सेनगाव, जालना व इतर पथकांनी संयुक्तरीत्या पार पाडली. आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें