सेनगाव/विश्वनाथ देशमुख
सेनगाव तालुक्यातील सुकळी बुद्रुक गावात पिसाळलेल्या कुत्र्याच्या भीषण हल्ल्यानंतर प्रशासनाने कमालीची तत्परता दाखवली आहे.घटनेचे गांभीर्य ओळखून केवळ २४ तासांच्या आत प्रतिबंधात्मक पावले उचलत,पशुसंवर्धन विभागाने गावात रेबीज प्रतिबंधक मोहिमेचा धडाका उडवून दिला.दोन दिवस चाललेल्या या धडक शोध मोहिमेत गावातील व परिसरातील सुमारे ३० कुत्र्यांचे यशस्वी लसीकरण करण्यात आले आहे.
दि.१९ ऑगस्ट बुधवार रोजी सुकळी बुद्रुक गावात एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक उच्छाद मांडला.या कुत्र्याने रस्त्याने जाणाऱ्या इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या एका चिमुरडीसह अन्य तीन नागरिकांवर एकापाठोपाठ एक हिंसक हल्ले चढवून त्यांना गंभीर जखमी केले.एवढ्यावरच न थांबता या पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील इतर १० कुत्र्यांवरही हल्ला करून त्यांचा चावा घेतला.या भयानक प्रकारामुळे संपूर्ण सुकळी बुद्रुक गावात प्रचंड भीतीचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
*जखमींवर हिंगोलीत उपचार; प्रकृती स्थिर…*
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीसह चारही नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदतीसाठी हलवण्यात आले.सध्या या सर्व जखमींवर हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.रुग्णालयातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर अँटी-रेबीज आणि इतर आवश्यक उपचार करण्यात येत असून,सध्या सर्व जखमींची प्रकृती चांगली व स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
*सेनगाव पशुवैद्यकीय वरिष्ठ अधिकारी गावात;फिरत्या पथकाची कामगिरी…*
घटनेची माहिती मिळताच सेनगाव येथील पशुवैद्यकीय आरोग्य यंत्रणा तातडीने ॲक्शन मोडमध्ये आली.दि.२१ ऑगस्ट रोजी पशुवैद्यकीय सहाय्यक आयुक्त डॉ.संतोष काणेडखेडकर,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत देवकर आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सुभाष निरगुडे यांनी सुकळी बुद्रुक गावाला थेट भेट दिली.अधिकाऱ्यांनी भयभीत झालेल्या ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला,तसेच रेबीज संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.यानंतर गावात पुढील धोका आणि रेबीजचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाचे विशेष ‘फिरते पथक’ तैनात करण्यात आले.या पथकामध्ये श्री.बोडखे,श्री.पावडे आणि श्री.खरात यांचा समावेश होता.
*दोन दिवसांचे ‘धडक ऑपरेशन’;३० कुत्र्यांना लस…*
रेबीजचा संसर्ग इतर प्राण्यांमध्ये किंवा माणसांमध्ये पसरू नये,म्हणून या फिरत्या पथकाने गावात सलग दोन दिवस व्यापक शोध मोहीम राबवली.जीवाची पर्वा न करता पथकातील कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिक त्र्यंबकराव जाधव,डाॅ.गणेशराव पाचपील्ले,विठ्ठल धाकतोडे,मारोती जाधव यांच्या मदतीने गावातील आणि परिसरातील सर्व पाळीव तसेच भटक्या कुत्र्यांचा शोध घेतला.दोन दिवस चाललेल्या या धडक मोहिमेत सुमारे ३० कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली,अशी माहिती सेनगावचे सहाय्यक आयुक्त डॉ.संतोष काणेडखेडकर यांनी दिली आहे.
‘साप्ता.खरा कायदा’ डिजिटल मीडियाने या प्रकरणाला वाचा फोडली होती.प्रशासनाने दाखवलेली ही आक्रमक आणि तत्पर भूमिका,तसेच फिरत्या पथकाच्या अथक परिश्रमामुळे सुकळी बुद्रुक गावासमोरील रेबीजचा मोठा धोका टळला असून ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा श्वास सोडला आहे.










