परभणी जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. पाथरीतील रेणापुरात युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परमिट घेतल्यानंतरही वीजप्रवाह सुरूच राहिल्याने युवकाचा मृत्यू झाला आहे.मृतदेह महावितरण कार्यालयात आणत ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान यावेळी ग्रामस्थांनी आर्थिक मदत आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
परमिट घेऊन वीजपुरवठा बंद असल्याची खात्री केल्यानंतर घडली घटना
परमिट घेऊन वीजपुरवठा बंद असल्याची खात्री केल्यानंतर कृषी वाहिनीवरील रोहित्राच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेलेल्या 36 वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. पाथरी तालुक्यातील रेणापुर शिवारात ही धक्कादायक घटना घडली. ञानेश्वर गोरे हे रेणापुर शिवारातील कृषी वाहिनीच्या रोहित्रावर दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेले होते. दुरुस्तीच्या कामासाठी स्थानिक 33 केव्ही उपकेंद्राकडून आवश्यक परमिट घेण्यात आले होते, असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मात्र,गोरे रोहित्रावर काम करत असतानाच अचानक विद्युतप्रवाह सुरू झाला.यात त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट पाथरी येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयात आणला
घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी ज्ञानेश्वर गोरे यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट पाथरी येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालयाच्या परिसरात आणला. मृताच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत द्यावी आणि घटनेस जबाबदार असलेल्या लाईनमनसह संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह कार्यालय परिसरातून हलवणार नाही, तसेच गरज पडल्यास याच ठिकाणी अंत्यविधी करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.










