हिंगोली प्रतिनिधी सतीश खिल्लारे
समाधान खिल्लारे यांची आडोळ गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर अवघी ५८ गुंठे शेती होती. या कोरडवाहू जमिनीवर सोयाबीनची लागवड करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. अत्यल्प शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर पत्नी, एक मुलगा आणि तीन मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारी ते सांभाळत होते. मागील अनेक वर्षांपासून ते कुटुंबासह शेतातील आखाड्यावर वास्तव्यास होते.
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीत अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी झाली होती. नापिकीमुळे आर्थिक परिस्थिती बिकट होत असताना कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागवायचा कसा, मुलांचे शिक्षण पुढे सुरू ठेवायचे कसे आणि मुलींच्या लग्नाची जबाबदारी कशी पार पाडायची, असे अनेक प्रश्न कुटुंबासमोर उभे होते. शेतीवरच पूर्णपणे अवलंबून असलेल्या या कुटुंबाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत होती.विशेष म्हणजे, त्यांच्या मोठ्या मुलीचे नांदेड येथे शिक्षण सुरू असून, अन्य दोन मुली माध्यमिक शिक्षण घेत आहेत. मुलगा वडिलांना शेतीकामात मदत करीत होता. मर्यादित जमीन, नापिकी आणि कुटुंबाच्या भविष्याची चिंता अशा परिस्थितीत या कुटुंबावर संकटांचे सावट होते. मात्र, त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही.
शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले
सोमवारी सकाळी समाधान यांच्या पत्नी उठल्या असता ते घरात दिसून आले नाहीत. त्यामुळे त्यांनी परिसरात शोध सुरू केला. यावेळी शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत समाधान आढळून आले. हा प्रकार पाहताच त्यांच्या पत्नीने आरडाओरड केली. आवाज ऐकून परिसरातील शेतकरी घटनास्थळी धावून आले. या घटनेने कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. बिट जमादार चाटसे आणि पोलिस पाटील राजपाल चिंतारे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी मस्के यांनीही घटनास्थळी भेट दिली.
तीन मुलींच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर
समाधान खिल्लारे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलींचे शिक्षण, त्यांच्या विवाहाची जबाबदारी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह यांचा प्रश्न आता गंभीर बनला आहे.
दुष्काळामुळे शेतीचे उत्पन्न घटत असताना अल्पभूधारक शेतकऱ्यांना कुटुंबाचा खर्च भागविणेही कठीण होत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी कुटुंबांना वेळेत आर्थिक मदत आणि शासकीय योजनांचा लाभ मिळणे महत्त्वाचे आहे.शासनाने कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी
मुलांच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी शासकीय योजनांचा लाभमिळवून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.
दुष्काळ, नापिकी आणि अत्यल्प शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबांच्या अडचणींकडे वेळीच लक्ष देण्याची गरज या दुर्दैवी घटनेने अधोरेखित केली आहे. एका शेतकऱ्याचा मृत्यू ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून, संकटात सापडलेल्या ग्रामीण शेतकरी कुटुंबांच्या परिस्थितीचा गंभीर प्रश्न आहे.
साप्ताहिक खरा कायदा











