हिगोंली प्रतिनिधी:-जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलिस पाटील भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांकडून पैशांची मागणी केल्याच्या गंभीर आरोपावरून हिंगोली तहसील कार्यालयातील शिपाई भिमा रंगनाथ झेंडे यांना जिल्हाधिकारी राहूल गुप्ता यांनी निलंबित केले आहे. या कारवाईमुळे महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात सध्या पोलिस पाटील पदांच्या तब्बल ३४३ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्षपणे पार पाडावी, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी राहूल गुप्ता यांनी यापूर्वीच प्रशासनाला दिल्या होत्या. उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले होते.
दरम्यान, भरती प्रक्रियेदरम्यान हिंगोली तहसीलमधील शिपाई भिमा रंगनाथ झेंडे यांनी उमेदवार तसेच त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून निवडीसाठी पैशांची मागणी केल्याची बाब समोर आली. याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी प्राथमिक चौकशी करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता.
या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकारी राहूल गुप्ता यांनी ७ फेब्रुवारी रोजी आदेश काढत संबंधित शिपायाचे निलंबन केले. निलंबन काळात त्यांना मुख्य तहसील कार्यालय, औंढा नागनाथ येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, पोलिस पाटील भरती प्रक्रियेअंतर्गत ८ फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या या तातडीच्या कारवाईचे जिल्ह्यात सर्वत्र स्वागत होत असून उमेदवारांमध्येही दिलासा व्यक्त केला जात आहे.












