हिंगोलीत अफू शेतीवर पोलिसांची ऐतिहासिक कारवाई; ३.५४ लाखांची अफू जप्त, एकाला अटक

हिंगोली : अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत हिंगोली पोलिसांनी आजवरची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक कारवाई करत वसमत तालुक्यातील शिरळी येथे तब्बल चार गुंठ्यांतील अफूची शेती उद्ध्वस्त केली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली.

हिंगोली जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अफूची लागवड शोधून काढण्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. पोलीस अधीक्षक डॉ. रोहन यांनी पदभार स्वीकारल्यापासून गुन्हेगारी व अवैध धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, या कारवाईमुळे अमली पदार्थ माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी शिरळी शिवारात छापा टाकला. यावेळी १ क्विंटल ७७ किलो ४५ ग्रॅम वजनाची अफूची झाडे जप्त करण्यात आली. जप्त अफूची किंमत ३ लाख ५४ हजार ९०० रुपये इतकी आहे. या प्रकरणी प्रताप सुरेश नलगे (वय ४२, रा. शिरळी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत कुरुंदा पोलीस ठाण्यात १७ फेब्रुवारी रोजी पहाटे गुन्हा नोंद करण्यात आला.

तालुक्यात अफूची शेती बहरल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

“कोणाचीही गय केली जाणार नाही”

या कारवाईनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जिल्ह्यात अफू, गांजा किंवा इतर कोणत्याही अमली पदार्थांची लागवड किंवा विक्री करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. अशा अवैध प्रवृत्तींविरुद्ध पोलिसांची मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे.”

या पथकाने बजावली महत्त्वाची भूमिका

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सपोनि शिवसांब घेवारे, सपोनि कारामुंगे, पोलीस अंमलदार भुजंग कोकरे, गजानन पोकळे, ज्ञानेश्वर गोरे, साईनाथ कंठे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, किशोर सावंत, संदीप टाक व साठे यांच्या पथकाने सहभाग घेतला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें