सेनगाव येथे बँक कर्मचाऱ्याचे सोंग घेऊन १८,५०० रुपयांची फसवणूक
हिंगोली प्रतिनिधि:-सेनगाव तालुक्यातील सेनगाव पोलिस स्टेशन हद्दीत फसवणुकीची घटना उघडकीस आली असून दोन अज्ञात व्यक्तींनी बँक कर्मचारी असल्याचे भासवून एका महिलेची १८,५०० रुपयांची फसवणूक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा रामकृष्ण तळणकर (वय ५२, रा. सरस्वती नगर, सेनगाव) या दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजता महाराष्ट्र ग्रामीण बँक, सेनगाव येथे गेल्या होत्या. यावेळी दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधत आपण बँकेचे कर्मचारी असल्याचे सांगितले. त्यांच्या जवळील नोटा खऱ्या की खोट्या हे तपासण्याचा बहाणा करून आरोपींनी पैसे हातात घेतले.तपासणीच्या नावाखाली ५०० रुपयांच्या ३७ नोटा, असा एकूण १८,५०० रुपयांचा रोख रक्कम घेऊन आरोपी तेथून पसार झाले. ही बाब लक्षात येताच संबंधित महिलेने सेनगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये व पैसे हातात देताना दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.












