सेनगाव तालुक्यात थरार! दुचाकीवरून सराफा व्यापाऱ्याला लुटले; ६.९७ लाखांचा ऐवज लंपास

🔴खरा कायदा न्युज नेटवर्क🔴

हिंगोली | प्रतिनिधी

सेनगाव तालुक्यातील धनौरा शिवारात भरदिवसा सराफा व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला करून सुमारे ६ लाख ९७ हजार ५०० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन पथकांमार्फत आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश संभाजी कंधारकर (रा. लोणार, जि. बुलढाणा) यांचे सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथे सोने-चांदीचे दुकान आहे. दि. ३० जानेवारी रोजी दुपारी सुमारे ४ वाजता भावाच्या निधनाची बातमी मिळाल्याने त्यांनी दुकान बंद करून दुचाकीने रिसोडकडे प्रस्थान केले. धनौरा शिवारात दबा धरून बसलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांचा पाठलाग केला.

दरम्यान, आरोपींनी त्यांच्या दुचाकीला धडक देत त्यांना खाली पाडले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून मारहाण करत जवळील बॅग जबरदस्तीने हिसकावून नेली. या बॅगेत ११४.५ ग्रॅम सोने, ३६०० ग्रॅम चांदी, रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण ६,९७,५०० रुपयांचा ऐवज होता. लूट केल्यानंतर तिघेही आरोपी दुचाकीवरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराय घेवारे, दीपक मस्के, टी. के. वंजारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गुन्हे शाखेची विशेष पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी व्यापक मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के करीत असून अद्याप आरोपी अटकेत आलेले नाहीत. भरदिवसा घडलेल्या या धाडसी लुटीमुळे परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें