सेनगाव:-केंद्रा खुर्द येथे अंगावर भिंत कोसळून कामगाराचा मृत्यू; परिसरात हळहळ

सेनगाव प्रतिनिधी

सेनगाव तालुक्यातील केंद्रा खुर्द येथे मजुरीचे काम करत असताना अंगावर भिंत कोसळून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २५ डिसेंबर) घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

केंद्रा खुर्द येथील रहिवासी दत्तराव रामराव जाधव हे सकाळी अंदाजे ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास एका घराच्या बांधकामाशी संबंधित काम करत होते. यावेळी अचानक घराची भिंत कोसळून ती थेट त्यांच्या अंगावर पडली. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ढिगाऱ्याखालून दत्तराव जाधव यांना बाहेर काढले.जखमी अवस्थेत त्यांना तातडीने अकोला येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच दुपारी १ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूची माहिती समजताच नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले.या घटनेची नोंद घेण्यासाठी संबंधित पोलीस व महसूल प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली असून घटनास्थळी पंचनामा करण्याची तयारी करण्यात येत आहे. भिंत कोसळण्यामागील नेमके कारण काय होते, बांधकामावेळी आवश्यक सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याचा तपास केला जात आहे.या दुर्घटनेनंतर केंद्रा खुर्द परिसरात शोककळा पसरली आहे. मजुरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, कामाच्या ठिकाणी मूलभूत सुरक्षा उपाययोजना राबविण्याची गरज ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.दरम्यान, या प्रकरणी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष बालाजी देशमुख यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मृत कामगाराच्या कुटुंबावर अचानक उद्भवलेल्या संकटाचा विचार करता शासनाने तत्काळ भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, असेही त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें