कळमनुरी तालुक्यातील खरवड शिवारात पाच वर्षाच्या मुलासह त्याच्या आईचा मृतदेह गुरुवारी ता. ६ सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे. कळमनुरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसद येथील ज्योती सागर सावळे (३०) व त्यांचा मुलगा राज सावळे (५) हे दोघे जण खरवड येथे दीपावली निमित्त आई वडिलांकडे आले होते. मागील काही दिवसांपासून दोघेही खरवड येथेच राहात होते. त्यानंतर चार दिवसांपूर्वीच ज्योती ह्या त्यांचा मुलगा राज याला सोबत घेऊन बाहेर जाऊन येते असे सांगून आई, वडिलांच्या घरून निघाल्या होत्या. मात्र सायंकाळी उशीरापर्यंत त्या घरी आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी चार दिवसांपासून शोध सुरु केला होता.
दरम्यान, आज सकाळी खरवड गावाजवळील असलेल्या तलावामध्ये मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, उपनिरीक्षक इंगळे, जमादार देविदास सूर्यवंशी, गुलाब जाधव, अंकुश शेळके यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदर मृतदेह ज्योती व त्यांचा मुलगा राज यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी तातडीने या प्रकाराची माहिती त्यांच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर त्यांचे नातेवाईक देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहेत. या दोघांच्या मृत्यूमागचे नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही.













