🛑खरा कायदा न्युज नेटवर्क 🛑
परभणी:- जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी गाव शिवारात असलेल्या तलावांत धुणे धुताना दोन सख्ख्या बहिणी तळ्यात बुडाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी ३० ऑक्टोबर दुपारी घडली. यात एकीचा मृत्यू झाला असून दुसरीची प्रकृती चिंताजनक आहे.
सातपूर, नाशिक येथे वास्तव्यास असलेले परमेश्वर बारकिराम चव्हाण हे कुटुंबासह आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी काही दिवसांपूर्वी मूळ गावी, कुऱ्हाडी येथे आले होते. लग्नसोहळा संपल्यानंतर गुरुवारी दुपारी त्यांच्या विवाहित मुली पूजा परमेश्वर चव्हाण (२०) आणि अविवाहित मुलगी संध्या परमेश्वर चव्हाण (१७) या दोघी धुणे धुण्यासाठी गावशेजारील तळ्यावर गेल्या.
धुणे धुत असताना दोघींचा पाय घसरून त्या तळ्यात पडल्या. शेजारील महिलांनी आरडाओरड केली असता गावातील नागरिक धावून आले आणि दोघींना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. काही वेळानंतर पूजा ही सापडली. तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, संध्या ही तळ्यातील खोल खड्ड्यात अडकल्याने तिला शोधण्यासाठी अर्धा तासाचा अवधी लागला. अखेर ती सापडल्यावर तिला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ पारवे यांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी पोलिसांत नोंद झालेली नव्हती.












