Washim News: सर्व परीक्षार्थींची उत्तरे एकसारखीच; वाशीम जिल्ह्यात सामूहिक कॉपी, २६ शिक्षकांच्या निलंबनाचे आदेश!

वाशीम:-जिल्ह्यातील टो-जुमडा फाटा येथील श्रीमैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर सोमवारी (ता. १६) बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.सोमवारी भरारी पथकाने या केंद्राची अचानक पाहणी केली असता केंद्रावरील सर्व परीक्षार्थ्यांनी उत्तरे एकसारखी लिहिल्याचे आढळून आले. सदर प्रकरणात केंद्रावरील २६ शिक्षकांच्या निलंबनाचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित संस्थेला दिले आहेत.

 

सध्या इयत्ता बारावीचे पेपर सुरू असून सोमवारी भौतिकशास्त्राचा पेपर होता. या परीक्षेदरम्यान श्रीमैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय (केंद्र क्र. ०९०६) या परीक्षा केंद्रावर एकूण ५८४ नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी ५८१ विद्यार्थी उपस्थित होते. भरारी पथकाने या केंद्राला सोमवारी दुपारी साडे बारा वाजता अचानक भेट दिली. या भेटीत विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचीही पथकाच्या सदस्यांनी पाहणी केली. या तपासणीत धक्कादायक बाब समोर आली. सर्व ५८१ विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे शब्दशः एकसारखी लिहिल्याचे दिसून आले. काही उत्तरपत्रिकांमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांवर पेन किंवा पेन्सिलने खुणा केल्याचेही निदर्शनास आले.

 

पथकाला या परीक्षाकेंद्रावर अनेक गंभीर असुविधा आढळून आल्यात. केंद्रावर परीक्षार्थ्यांची बसण्याची व्यवस्था टिनशेडमध्ये व अत्यंत दाटीवाटीत करण्यात आली होती. अपुरी प्रकाशयोजना, पंख्यांची कमतरता आणि केवळ आठ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर संपूर्ण केंद्राची जबाबदारी असल्याचे आढळून आले. वीज खंडित झाल्यास जनरेटरची कोणतीही सुविधा नव्हती. तपासादरम्यान एक कर्मचारी मोबाईल फोन घेऊन केंद्रात फिरताना आढळला. ते मोबाईल तपासणीसाठी मागण्यात आले असता देण्यास टाळाटाळ करण्यात आली. अखेर ते दोन्ही मोबाईल जप्त करण्यात आले. हे मोबाईल पुढील चौकशीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.

 

या प्रकरणात श्रीमैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रावरील संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची करवाई आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. सदर प्रकरणात माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी तालुका शिक्षण अधिकाऱ्यांना सदर संस्थेच्या शिक्षकांना निलंबित करण्याची कारवाई सुरू करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार केंद्रावरील २६ शिक्षकांना निलंबित करण्याचे निर्देश गट शिक्षणाधिकाऱ्यांनी सदर संस्थेला दिले आहेत. आता शिक्षण विभाग या प्रकरणात किती कठोर कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

भरारी पथकाचे निष्कर्ष

 

सामूहिक कॉपीचा प्रकार संघटित पद्धतीने झाल्याचे पथकाला आढळून आले. पथकानेही आपल्या अहवालात स्पष्ट नमूद केले आहे की, उपस्थित ५८१ विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केली आहे. भरारी पथकाचा अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, उत्तरपत्रिकांतील साम्य आणि केंद्रावरील भौतिक सुविधांचा अभाव यावरून हा प्रकार नियोजनबद्ध असल्याचे दिसून येत आहे.

 

टो-जुमडा फाटा येथील श्रीमैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालयात सामूहिक कॉपी आढळून आली आहे. या संदर्भात गट शिक्षणाधिकाऱ्यांना सदर संस्थेच्या २६ शिक्षकांना निलंबित करण्याची कारवाई करण्यास सांगितले आहे. गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तसे निर्देश शाळेच्या व्यवस्थापनाला दिले आहेत. व्यवस्थापनाने दोषी शिक्षकांना निलंबित केले नाही, तर सदर संस्थेवर प्रशासक नेमण्याची शिफारस केली जाईल.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें