प्रतिनिधी : हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहर बुधवारी (दि. १५) मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने हादरले. शहरातील बसस्थानक परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे हिंसक रूपांतर होऊन झालेल्या गोळीबारात लुकमान सिद्दीकी यांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सात जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी शहरालगतच्या इंदिरानगर परिसरातील काही तरुण आणि पठाण मोहल्ल्यातील तरुणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. यापूर्वी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर हा वाद शांत झाल्याचे दिसत होते. मात्र बुधवारी रात्री साडेअकरा ते पावणेबारा वाजण्याच्या सुमारास बसस्थानक परिसरात दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आले. सुरुवातीला दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर एका गटातील काही जणांनी गावठी कट्ट्यांतून गोळीबार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
या गोळीबारात लुकमान सिद्दीकी यांचा जागीच मृत्यू झाला. तर असोमा पठाण, सारेक पठाण, सेहरअली पठाण आणि मेहराज पठाण हे जखमी झाले. जखमींना तातडीने कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा, अपर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, कळमनुरीचे पोलिस निरीक्षक जमीर नाईक, सहाय्यक पोलिस निरीक्षक तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनास्थळाची तपासणी करून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली.
पोलिसांनी तातडीने सात जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही संशयितांचा शोध सुरू असून त्यासाठी विविध ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या घटनेबाबत पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी घटनेला दुजोरा देत, हा प्रकार जुन्या वैमनस्यातून घडल्याचे सांगितले. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कळमनुरी पोलिस करीत आहेत.











