नांदेड पोलिस अधीक्षक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा तगादा लावल्यामुळे एका 24 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, मृत तरुण हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आहे. त्याची नांदेड पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिक अभिषेक सातपुते याच्यासोबत मागील 7-8 वर्षांपासून घनिष्ट मैत्री होती. पण कालांतराने या मैत्रीचे रुपांतर छळात झाले. गत शनिवारी (18 एप्रिल) हे दोघे वडगाव व आखाडा बाळापूर परिसरात एकत्र फिरत होते. यावेळी सातपुते यांनी मृत तरुणाकडे अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी तगादा लावला. त्यांच्या या सततच्या त्रासाला कंटाळून सदर तरुणाने वडगाव शिवारातील एका झाडाला गळ्यातील रुमालाने गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना उजेडात आल्यानंतर संतप्त कुटुंबीय व गावकऱ्यांनी आरोपी अभिषेक सातपुते याच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय शवविच्छेदन करण्यास विरोध केला. यामुळे आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात मोठा तणाव निर्माण झाला. अखेर पोलिस उपाधीक्षक राजकुमारे केंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर नागनाथ लाखाडे यांच्या तक्रारीनुसार, अभिषेक सातपुते याच्यावर आत्महत्येत प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर जवळपास 22 तासांनी शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.












