वाशीम-: टँकरने दुचाकीला चिरडलं; कृषी अधिकाऱ्याचा मृत्यू, सहाय्यक अधिकारी गंभीर जखमी

रिसोड प्रतिनिधी

वाशीम जिल्ह्याच्या रिसोड-मेहकर मार्गावरील सरपखेडा फाट्याजवळ भीषण अपघात घडला. वेगात येणाऱ्या एका टँकरने दुचाकीला जोरदार धडक देऊन चिरडल्याने, कृषी विभागाचे मंडळ अधिकारी जागीच ठार झाले, तर त्यांच्यासोबत असलेले सहाय्यक कृषी अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत.या घटनेमुळे संपूर्ण महसूल आणि कृषी विभागात शोककळा पसरली आहे.

 

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कृषी अधिकारी विलास बारबले (वय ५५) आणि सहाय्यक कृषी अधिकारी प्रवीण पुन्नमवार हे दोघेही आपल्या शासकीय कामानिमित्त एकलासपूरहून रिसोडकडे दुचाकीने परतत होते. सरपखेडा फाट्याजवळ पोहोचले असता, समोरून येणाऱ्या एका भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली.

 

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. अपघाताची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. स्थानिकांच्या मदतीनं जखमी अधिकाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हा अपघात इतका भयानक होता की, विलास बारबले टँकरच्या चाकाखाली चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, प्रवीण पुन्नमवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

रस्त्याचे काम ठरले काळ?

या भीषण अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. अर्धवट किंवा चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळेच हा अपघात घडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. विलास बारबले यांच्या निधनाने कृषी विभागाने एक अनुभवी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला आहे. पोलीस सध्या फरार टँकर चालकाचा शोध घेत असून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें