औंढा नागनाथ–वसमत मार्गावर औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर जवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवार (दि. 13) रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.
या अपघातात पार्वतीबाई सुदाम कदम (वय 33, रा. दौडगाव) यांचा मृत्यू झाला. तर चांदु रामराव मगर (वय 35), शिवम चांदु मगर (वय 6, रा. दौडगाव) आणि शेख गौस शेख शब्बीर (वय 35, रा. शिरड शहापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख गौस हे दुचाकी क्रमांक MH 38 AF 5538 वरून शिरडकडे जात होते. तर दुचाकी क्रमांक MH 30 U 1106 वरून चांदु मगर, पार्वतीबाई कदम व सहा वर्षीय शिवम मगर हे औंढा नागनाथकडे येत असताना शिरड शहापूरजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे, शिरड चौकीचे पोलीस उपनिरीक्षक गजानन गिरी, जमादार शंकर भिसे, महामार्ग पोलीस खयामोद्दीन खतीब, राजाराम कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्था, नानिज यांच्या प्रेरणेने मोफत रुग्णसेवेसाठी उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकेतून जखमींना औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, डॉक्टरांनी पार्वतीबाई कदम यांना मृत घोषित केले, तर उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.













