सेनगाव – खोट्या गुन्ह्यांवरून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा संताप उसळला
तुपकरांचा इशारा: “चळवळीचा आवाज दाबू देणार नाही; जशास तसे उत्तर देऊ”
सेनगाव:-हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षांवर दाखल करण्यात आलेल्या कथित खोट्या गुन्ह्याने ग्रामराजकारणात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या या प्रकरणामुळे तालुक्यातील वातावरण तापले आहे. “हा प्रकार शेतकरी चळवळीचा आवाज दडपण्याचा उघड प्रयत्न असून असे प्रकार आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही,” असा रोखठोक इशारा संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी समाज माध्यमांवरून दिला.
*घटना कशी घडली?*
दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सेनगाव पंचायत समिती कार्यालयात संविधान दिन साजरा झालेला नाही, असा आरोप करीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहून आंदोलन केले. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना संविधान दिनाचे महत्व, कर्तव्य आणि प्रशासनिक जबाबदारीबाबत जाब विचारला. आंदोलनादरम्यान सादर केलेल्या मुद्द्यांचा व्हिडिओ संघटनेने समाजमाध्यमांवर शेअर केला.
हा व्हिडिओ आणि आंदोलनाचा सूर गटविकास अधिकाऱ्यांना जिव्हारी लागल्याचा आरोप संघटनेने केला आहे. याच प्रकरणाचा आधार घेत अधिकाऱ्यांनीच उलट संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
*अट्रॉसिटीसह तीन जणांवर गुन्हा*
गटविकास अधिकाऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांच्यासह तिघांवर बदनामी, शासकीय कामात अडथळा आणि अॅट्रॉसिटी या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यासाठी अर्ज दाखल केला. पोलिसांनी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून तत्काळ गुन्हा दाखल केल्यामुळे संघटना आणि स्थानिक शेतकरी वर्गामध्ये संताप निर्माण झाला आहे.
*“चौकशी न करता थेट गुन्हा – पोलिसांनी काय भूमिका निभावली?”*
या प्रकरणावर तुपकरांचा तीव्र आक्षेप आहे. ते म्हणाले—
“घटना कोणत्याही प्रशासनिक कार्यालयात घडली असली तरी चौकशी करणे हे पोलिसांचे पहिले कर्तव्य आहे. मात्र सेनगाव पोलिसांनी कुठलीही पडताळणी न करता थेट गुन्हा दाखल केला. हे लोकशाही प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह आहे.”
तुपकरांनी हेही स्पष्ट केले की संविधान दिन न साजरा झाल्याची वस्तुस्थितीच आंदोलनाचा केंद्रबिंदू होती. कार्यकर्त्यांनी केवळ आपल्या लोकशाही हक्काचा वापर केला, मात्र त्यावर गुन्हे दाखल करणे म्हणजे सरळसरळ दडपशाही आहे.













