🔴खरा कायदा न्युज नेटवर्क⭕
हिंगोली शहरात एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह दोघांच्या तपासणीमध्ये 4500 रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या असून या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 7 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांची चौकशी सुरु केली आहे.
हिंगोली शहरात पालिका निवडणुका सुरु असून या निवडणुकीच्या निमित्ताने शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या शिवाय रात्री दहा वाजल्यानंतर फिरणाऱ्यांची चौकशी केली जात आहे. त्यासाठी हिंगोली शहर पोलिसांनी स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. या पथकाकडून शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे.
दरम्यान, हिंगोली शहरात गुरुवारी ता. 6 रात्रीच्या सुमारास पोलिस निरीक्षक संदीप मोदे, जमादार अशोक धामणे, शेख मुजीब, गणेश लेकुळे, गणेश वाबळे, शंकर ठोंबरे, जोगे यांचे पथक गस्तीवर होते. सदर पथक इंदिरा गांधी चौकात आल्यानंतर त्या ठिकाणी दोघे जण संशयास्पदरीत्या फ़िरतांना दिसून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी करण्यास सुरवात केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.या प्रकारामुळे पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यामध्ये एका विधी संघर्ष ग्रस्त बालकांसोबत देवानंद उर्फ सोनू जाधव याचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांची पंचा समक्ष तपासणी केली असता त्यांच्याकडे 4500 रुपयांच्या प्रत्येकी पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत. पोलिसांनी सदरील नोटा जप्त केल्या आहेत.
या प्रकरणी जमादार शेख मुजीब यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. ७ गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांची सखोल चौकशी केली जात असून त्यांनी या नोटा कोठून आणल्या होत्या याची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.













