🛑खरा कायद न्युज नेटवर्क🛑
🛑निवडणुक वार्ता-विश्वनाथ देशमुख, प्रतिनिधी सेनगाव🛑
सेनगाव तालुक्यातील पुसेगाव जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या गटातील राजकीय समीकरणे चांगलीच ढवळून निघाली आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याआधीच पुसेगाव गटात दोन्ही शिवसेना गटांतील जिल्हाप्रमुखांच्या प्रतिष्ठेची लढत रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तथा आमदार संतोषदादा बांगर यांनी स्वबळावर लढण्याचा नारा देत, युवा उद्योजक प्रितेश केदारमल सारडा यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच सेनगाव शहरात आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात आमदार बांगर यांनी सारडा यांच्या खांद्यावर हात ठेवत सेनगावच्या विकासासाठी या युवकाला आशीर्वाद द्या असे आवाहन करून उमेदवारीचा अप्रत्यक्ष दुजोरा दिला. दुसऱ्या बाजूला, शिवसेना (ठाकरे गट) कडून जिल्हाप्रमुख संदेश देशमुखस्वतःच या गटातून निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. हा आमचा बालेकिल्ला असूनपुसेगाव गटात आमचाच उमेदवार विजयी होणार, असा दावा देशमुख यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून शिवाजीराव जवळे, व सिरामे सर तर वंचित बहुजन आघाडी कडून सुनिल मुंदडा यांची नावे इच्छुकांच्या यादीत असून, राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस आणिभाजपाकडून अजून कोणाचेही नाव समोर आलेले नाही. शिंदे सेनेचे आमदार बांगर यांनी आपल्या गटातील कार्यकर्त्यांना या लढाईत शिंदे सेनेचा उमेदवार विजयी करा असा आदेश दिल्याने दोन्ही सेनेचे जिल्हाप्रमुख थेट प्रतिष्ठेच्या रणांगणात उतरले आहेत. आता पुसेगावात कोणत्या शिवसेनेचा झेंडा फडकणार ? हा प्रश्न सध्या जिल्हाभर चर्चेचा विषय ठरला आहे. राजकीय रणनीती, स्थानिक गटबाजी आणि कार्यकर्त्यांचे गणित यांचा संगम असलेल्या या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष खिळले असून, निकालानंतरच कोणाची प्रतिष्ठा वाचते आणि कोणाची पणाला जाते हे स्पष्ट होणार आहे.
राजकीय विश्लेषणः पुसेगाव गट हा सेनगाव तालुक्याचा राजकीय केंद्रबिंदू ठरला असून, दोन्ही शिवसेना गटांनी आपल्या जिल्हाप्रमुखांचा सन्मान टिकवण्यासाठी प्रतिष्ठेची लढाई लढायची तयारी केली आहे. त्यामुळे ही निवडणूक फक्त गट प्रतिनिधींची नसून, शिंदे व ठाकरे सेनेतील नेतृत्वाच्या ताकदीची थेट चाचणी ठरणार आहे.













