हिंगोली : हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गु.र.नं. 398/2025 या प्रकरणात तपासी अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक विलंब करून आरोपीला सहकार्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित तपासी अधिकारी सुधीर ढेंबरे यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
लिंबाळा (मक्ता), ता. जि. हिंगोली येथील शेख गयबू शेख मस्तान यांनी दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस अधीक्षक, हिंगोली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी व हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांकडे लेखी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्यांच्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दि. १० जुलै २०२५ रोजी गु.र.नं. 398/2025 दाखल करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित आरोपींनी फिर्यादीच्या मुलांवरदेखील गु.र.नं. 395/2025 दाखल केला असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीनुसार, दोन्ही प्रकरणांचा तपास संबंधित तपासी अधिकारी सुधीर ढेंबरे यांच्याकडे होता. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या प्रकरणातील दोषारोपपत्र एक वर्षानंतर न्यायालयात दाखल करण्यात आले, तसेच त्यामध्ये कलम 324 ची वाढ करण्यात आली. याशिवाय तपासी अधिकाऱ्याने आरोपींना सहकार्य केल्याची चर्चा जनमानसात असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित तपासी अधिकाऱ्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी आणि त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार शेख गयबू शेख मस्तान यांनी केली आहे.










