खरा कायदा वृत्तसेवा
कळमनुरी : गावातील अवैध धंदे तसेच कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातील महत्त्वाची माहिती पोलिस प्रशासनाला वेळोवेळी देणे आवश्यक असतानाही संबंधित माहिती देण्यास निष्काळजीपणा केल्याच्या कारणावरून कळमनुरी उपविभागातील तीन पोलिस पाटलांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग हिंगोली शहर यांच्या कार्यालयास प्राप्त झालेल्या अहवालानुसार, संबंधित पोलिस पाटलांनी महाराष्ट्र ग्राम पोलिस अधिनियम १९६७ अंतर्गत असलेल्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले आहे. गावातील पोलिस प्रशासन व नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा असताना तसेच गावात चालणाऱ्या अवैध धंद्यांची माहिती पोलिस प्रशासनाला देणे आवश्यक असतानाही त्यांनी सदर माहिती देण्यास निष्काळजीपणा केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
यामुळे उपविभागीय दंडाधिकारी, कळमनुरी यांनी दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजीच्या आदेशान्वये संबंधित तीन पोलिस पाटलांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी निलंबित केले आहे.
निलंबित करण्यात आलेल्या पोलिस पाटलांमध्ये—
विश्वनाथ देवराव जाधव, पोलिस पाटील, मौजे धानोरा जहागीर.
पांडुरंग दत्तात्रय भुरके, मौजे कोंढुर तसेच अतिरिक्त पदभार मौजे चिंचोडी.
प्रफुल्ल तुकाराम करडखेडे, पोलिस पाटील, मौजे वाकोडी.
यापुढे गावातील अवैध धंदे व इतर महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती पोलिस प्रशासनाला तातडीने देण्याबाबत सर्व पोलिस पाटलांनी दक्षता घ्यावी, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.











