परभणी:- योजनेंतर्गत मे २०२३ ते जून २०२४ या कालावधीत पूर्णा तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार कावेरी लक्ष्मण टाक, लक्ष्मीबाई बालाजी पांचाळ, इंदुबाई बालाजी कदम, रत्नमाला अण्णाराव भालेराव, देविदास देवाजी पांचाळ, नामदेव नारायण डाखोरे, सुरेखा माणिक डरांगे तसेच सुरेखा पूर्णा तालुक्यातील गौर येथील सुरेखा दिगंबर जोगदंड, सुवर्णाबाई नामदेव पारवे, बालाजी देवाजी पांचाळ आणि मीराबाई मुरलीधर जोगदंड हे जीवंत असतानाही मयत असल्याचे सांगून आणि त्यांचे वारसदार म्हणून खोटे मृत्यू प्रमाणपत्र तयार करून तसेच वारस म्हणून कागदपत्रे जोडून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या परभणी येथील कार्यालयात दाखल केले.याप्रकरणी परभणी येथील सरकारी कामगार अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या आणि गौर येथील दहा आरोपींविरुद्ध कोतवाली पोलिसांत भारतीय न्याय संहिता कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारी कामगार अधिकारी तात्याराव कराड यांनी कोतवाली पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध योजनेंतर्गत आर्थिक लाभ देण्यात येतो. लाभासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्याने कुठूनही अर्ज सादर करता येतो. सादर केलेल्या अर्जांची पडताळणी करून मान्यतेसाठी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येते. त्यानंतर मंजुरी मिळताच मंडळाच्या मुंबई येथील कार्यालयातून संबंधित बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात थेट लाभ जमा करण्यात येतो.या कार्यालयातून नोंदणीकृत कामगारांना मृत्युपश्चात मिळणारी लाभाची प्रति कामगार २ लाख ३४ हजार रुपये अशी एकूण १० कामगारांची एकूण २३ लाख ४० हजार रुपये रक्कम आपल्या खात्यात वळती करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत संबंधित ग्रामसेवकांचा अहवालही मागविण्यात आला. या फसवणूक प्रकरणातील लक्ष्मण बाबुराव टाक यांनी मिळालेली रक्कम परभणी येथील कार्यालयात परत केली. तर इतर आरोपींनी लाभाची रक्कम परत केली नाही.यावरून सरकारी कामगार अधिकारी तात्याराव कराड यांच्या फिर्यादीवरून, पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या येथील लक्ष्मण बाबुराव टाक, बालाजी रामजी पांचाळ, बालाजी भीमराव कदम, अण्णाराव धोंडीबा भालेराव, माणिक महादू डरांगे, मिराबाई देविदास पांचाळ, मुक्ताबाई नामदेव डाखोरे आणी पूर्णा तालुक्यातील गौर येथील दिगांबर व्यंकटी जोगदंड, मुरलीधर नारायण जोगदंड, ज्ञानोबा चुडामणी पारवे व सुमनबाई बालाजी पांचाळ यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












