हिंगोली, प्रतिनिधी : वसमत शहरात वडिलांच्या ऑपरेशनसाठी बँकेतून काढलेली 10 लाख रुपयांची रोकड कारची काच फोडून लंपास करणाऱ्या आंतरराज्य चोरट्या टोळीचा हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 11 दिवसांत छडा लावला आहे. या प्रकरणी आंध्रप्रदेशातील दोन आरोपींना त्यांच्या मूळ गावातून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 5 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
वसमत तालुक्यातील पळसगाव येथील प्रशांत डाखोरे यांनी 9 जून रोजी वडिलांच्या ऑपरेशनसाठी युनियन बँकेतून 10 लाख रुपये काढले होते. ही रक्कम कारमध्ये ठेवून ते पुन्हा बँकेत गेले असता अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून रोकड असलेली बॅग चोरून नेली. या घटनेनंतर वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन व अपर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले. पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली.
तपासादरम्यान पोलिसांनी सलग 11 दिवस परिश्रम घेत वसमत, नांदेड, पूर्णा परिसर तसेच आंध्रप्रदेश सीमेलगतच्या भागातील तब्बल 70 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या तपासातून दुचाकीवरून आलेल्या संशयितांची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी आंध्रप्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील तिपा बिटरगुंडा गाव गाठून प्रदीप राजू पेटला आणि मधु जवळा भास्कर या दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या रकमेपैकी 5 लाख रुपये जप्त केले असून उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे. तसेच या टोळीने इतर जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार भुजंग कोकरे, शिवाजी जालमीरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले, ज्ञानेश्वर गोरे, साईनाथ कंठे, मुनिर मुन्नीवाले, शंकर हराळ, दत्ता नागरे व प्रदीप झुंगरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.











