परभणी प्रतिनिधी
परभणी-जिंतूर महामार्गावरील झरी जवळ शनिवारी पहाटे कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात कीर्तन सोहळ्यावरून परतणार्या तीन वारकर्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरासह संपूर्ण वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.
या अपघातात ह.भ.प. माऊली दिगंबरराव कदम वय ३० वर्षे, ह.भ.प. प्रसादराव कदम वय ४५ वर्षे, दोघेही रा. बोर्डी ता. जिंतूर तसेच ह.भ.प. दत्ता माणिकराव कर्हाळे वय ३० वर्षे, रा. मुडा ता. जिंतूर यांचा मृत्यू झाला आहे. प्राप्त माहितीनुसार हे तिघे परभणी तालुक्यातील पिंपळा येथे असलेल्या कीर्तन कार्यक्रमासाठी गेले होते. शनिवार १० जानेवारी रोजी पहाटे सुमारे एकच्या सुमारास कार्यक्रम आटोपून ते दुचाकी क्रमांक एमएच २२ एक्स ९५७६ ने परभणी-जिंतूर मार्गाने आपल्या गावाकडे परतत असताना झरी गावाजवळील लोअर दुधना डाव्या कालव्याजवळ त्यांच्या दुचाकीला कार क्रमांक एमएच २९ बीव्ही ७७९० या कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे बिट जमादार शंकर हाके यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ परभणी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासूनतिघांनाही मृत घोषित केले. या घटनेची बातमी कळताच बोर्डी, मुडा परिसरात तसेच वारकरी संप्रदायात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान सदर कारमध्ये किती व्यक्ती होते या बाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. याबाबत पोलीस तपास करत आहेत. पोलीसांच्या तपासानंतरच कारमधील व्यक्तींची माहिती समोर येईल.












