पंधरा वर्षांखालील मुलांच्या मोबाईल वापरावर पालकांनी आवर घालावा – शेतकरी नेते मारोती गिते यांचे आवाहन

पंधरा वर्षांखालील मुलांच्या मोबाईल वापरावर पालकांनी आवर घालावा

– शेतकरी नेते मारोती गिते यांचे आवाहन

हिंगोली, दि. २० डिसेंबर २०२५ :

सध्याच्या काळात मोबाईल फोन प्रत्येक घरात पोहोचला असून, पंधरा वर्षांखालील मुलांमध्ये मोबाईलचा अतिरेकी वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे बालकांच्या मानसिक व शारीरिक विकासावर विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र दिसत असून, पालकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे आवाहन शेतकरी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते मारोती गिते यांनी केले आहे.

बालअवस्था ही बुद्धी, विचारशक्ती व व्यक्तिमत्त्व विकासाची अत्यंत महत्त्वाची अवस्था आहे. या वयात मुलांनी अभ्यास, सुविचार, महान व्यक्तींची चरित्रे वाचन करणे तसेच खेळाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती राखणे आवश्यक आहे. मात्र मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांची कल्पनाशक्ती कमी होत असून, त्याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिक वाढीवर होत आहे.

मोबाईलच्या सततच्या वापरामुळे मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव, मानसिक कमजोरी, लहान वयातच डोळ्यांचे विकार व चष्मा लागण्यासारख्या समस्या निर्माण होत आहेत. यामुळे भविष्यात शैक्षणिक व आरोग्यविषयक अडचणी वाढू शकतात, असा इशाराही गिते यांनी दिला.

कल्पनाशक्ती ही मानवाची सर्वात मोठी ताकद असून, अनेक वैज्ञानिक शोध व प्रगती ही कल्पनाशक्तीच्या बळावरच शक्य झाली आहे. बालवयातच मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे ही मौल्यवान शक्ती नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

म्हणूनच पंधरा वर्षांखालील मुलांच्या मोबाईल वापरावर मर्यादा घालून त्यांना वाचन, खेळ व सर्जनशील उपक्रमांकडे वळवणे हे पालकांचे कर्तव्य आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी सजग राहावे, असे आवाहन मारोती गिते (शेतकरी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते, जिल्हा हिंगोली) यांनी केले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें