🔴खरा कायदा न्युज नेटवर्क⭕
हिंगोली : -जिल्ह्यातील तीन नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या तोंडावर महायुतीतील भाजप आणि शिंदे शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. हिंगोलीत भाजपाच्या अधिकृत उमेदवाराने अचानक उमेदवारी मागे घेत शिंदे सेनेत प्रवेश करत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तर वसमतमध्ये भाजपाने अध्यक्षपदासाठी दिलेली उमेदवारी अंतिम क्षणी बदलल्याने मोठे राजकीय वारे जोरात वाहू लागले आहेत.
हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या तीन महत्त्वाच्या नगरपरिषदांच्या रणधुमाळीला सुरुवात होताच महायुतीत उमेदवारी वाटपावरून तणाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर काल घडलेल्या दोन महत्त्वाच्या घटनांमुळे दोन्ही पक्षांच्या समीकरणावर मोठा परिणाम होत असल्याचे मानले जात आहे.
हिंगोलीत भाजपाला मोठा धक्का
प्रभाग १६-ब मधून भाजपाचे अधिकृत उमेदवार भास्कर बांगर यांनी एबी फॉर्मसह अर्ज दाखल केला होता. मात्र अर्ज मागे घेण्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी उमेदवारी मागे घेत अचानक शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षांतरामुळे भाजपची हिंगोलीतील रणनीती विस्कटली असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत.
वसमतमध्ये उमेदवार बदलल्याने गोंधळ
वसमतमध्ये निवडणूक चित्र अधिकच नाट्यमय बनले आहे. काँग्रेस सोडून शिवसेनेत दाखल झालेले डॉ. मारुती क्यातमवार यांनी अध्यक्षपदाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवले होते. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी सुटल्याने त्यांच्या पत्नी सविता क्यातमवार यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती.
परंतु अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी क्यातमवार दाम्पत्यानेच भाजपात प्रवेश करून सविता क्यातमवार यांनी भाजपमार्फत उमेदवारी दाखल केली. घटनांना आणखी कलाटणी देत गुरुवारी भाजपने त्यांची उमेदवारी मागे घेण्यास सांगत सुषमा बोड्डेवार यांची अध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली.
यामुळे वारंवार पक्षांतर करत अध्यक्षपद मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या क्यातमवार दाम्पत्याची अवस्था “तेलही गेले अन् तूपही गेले” अशी झाल्याची चर्चा आहे.
शिंदे सेनेची तक्रार मुख्यमंत्रीकडे
हिंगोलीतील घडामोडींवरून शिंदे शिवसेना भाजपच्या स्थानिक नेत्यांवर नाराज असून, याबाबतची तक्रार थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी दिली.













