सर्जाचा राज्यस्तरीय शंकरपट स्पर्धेत डंका; हिंगोलीच्या साईनाथ कऱ्हाळेंचा अभिमानास्पद विजय
बोरगाव (जि. सांगली): सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शंकरपट स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील दांडेगाव येथील साईनाथ कऱ्हाळे यांच्या ‘सर्जा’ या बैलाने अविश्वसनीय वेग आणि दमदार खेळी करत प्रथम क्रमांक पटकावला. सर्जाच्या या अप्रतिम कामगिरीमुळे कऱ्हाळेंना फॉर्च्यूनर कार, मानाची चांदीची गदा आणि एक दुचाकी अशी भव्य पारितोषिके मिळाली आहेत.
या वर्षीची शंकरपट स्पर्धा अत्यंत थरारक वातावरणात पार पडली. देशभरातून ५०० पेक्षा अधिक नामांकित बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. सर्जाने सुरुवातीपासूनच गती राखत संभाजीनगर जिल्ह्यातील गुप करोडी येथील सारंजेराव चव्हाण यांच्या ‘ट्रिपल हिंदकेसरी लखन’ या बैलाशी जोरदार झुंज दिली आणि अंतिम फेरीत अप्रतिम झेप घेत विजेतेपद मिळवले.
विजयानंतरचा बक्षीस वितरण सोहळा मंत्रालयात भव्य पद्धतीने पार पडणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साईनाथ कऱ्हाळे यांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती कऱ्हाळे यांनी दिली.
वर्षभराच्या तयारीतून सर्जाचे यश
दुर्गम भागातून आलेल्या सर्जाच्या या उल्लेखनीय यशामुळे हिंगोली जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्जाने यापूर्वीही विविध ठिकाणी तीन वेळा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावला आहे. केवळ एक वर्षांपूर्वी साईनाथ कऱ्हाळे यांनी नाशिक जिल्ह्यातून हा बैल विकत घेतला होता आणि कसून मेहनत, प्रशिक्षण व योग्य संगोपनाच्या जोरावर त्याला राज्यस्तरीय स्तरावर उभे केले.
या विजयामुळे दांडेगाव आणि हिंगोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, साईनाथ कऱ्हाळे आणि त्यांच्या सर्जाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ग्रामीण महाराष्ट्रात पुन्हा एकदा पारंपरिक बैलसंस्कृतीचा जयघोष झाला आहे.













