सेनगाव : धनगरवाडी येथील शेतकरी रामचंद्र खडसे यांच्या शेतातील मनरेगा अंतर्गत मंजूर सिंचन विहीर प्रत्यक्षात नसल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर प्रशासन अखेर हलले असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित विभागाकडून प्राथमिक अहवाल मागवण्यात आला असून दोषींवर कारवाईचे संकेत मिळत आहेत.
मनरेगा अंतर्गत विहीर पूर्ण झाल्याची नोंद असूनही प्रत्यक्ष ठिकाणी विहीर नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर जिल्हाभरात खळबळ उडाली होती. या संदर्भात शेतकरी रामचंद्र खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती.
प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायत, तांत्रिक अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडून माहिती मागवली आहे. प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे समजते.
दरम्यान, मनरेगा सारख्या महत्त्वाच्या योजनेत अनियमितता झाल्याचा आरोप होत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या योजनेत गैरप्रकार झाला असल्यास दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
या प्रकरणामुळे मनरेगा कामांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पारदर्शक यंत्रणा राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
प्रशासनाच्या चौकशीतून नेमका प्रकार काय आहे हे स्पष्ट होणार असून संबंधितांवर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












